Sunday, September 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी कळकवणेत घरफोडी; सव्वा लाखाचा ऐवज लंपास

कळकवणेत घरफोडी; सव्वा लाखाचा ऐवज लंपास

चिपळूण:- तालुक्यातील कळकवणे ऐनाडवाडी येथे घराच्या उघड्या दरवाजाचा गैरफायदा घेऊन घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक रत्नाकर शिंदे (वय ६३, रा. कळकवणे ऐनाडवाडी, ता. चिपळूण) हे ९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते १० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आपल्या घरी असताना ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने किंवा संशयित आरोपी राकेश प्रभाकर सुर्वे (रा. कळकवणे ऐनाडवाडी) याने फिर्यादीच्या संमतीशिवाय घरात प्रवेश केला.

घरातील पत्र्याच्या कपाटाच्या लॉकरमधून ६० हजार रुपयांचा २ तोळे वजनाचा सोन्याचा हार, ४५ हजार रुपयांचे दीड तोळे वजनाचे कानातील फुल्ले व पट्टी, ३ हजार रुपयांची १ ग्रॅम वजनाची सोन्याची नथणी, ७ हजार ५०० रुपयांचे अडीच ग्रॅम वजनाचे ‘ओम’ नावाचे सोन्याचे पान आणि १ हजार ५०० रुपये रोख असा एकूण १ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी १० सप्टेंबर रोजी रात्री ९:३८ वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ व ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.