लांजातील तरुणाला घेतले ताब्यात
रत्नागिरी:- कणकवली तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये दहावीत शिकणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ४ जुलै रोजी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी तिच्या अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर कणकवली पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवली. तिच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे तिचा मित्र दीपक जोतीराम माने (२४, रा. लांजा) याच्यासह तिला हातखंबा, रत्नागिरी येथून ताब्यात घेण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ जुलै रोजी ‘शाळेत जाते’ असे सांगून ही युवती वडिलांचा मोबाईल घेऊन घरातून बाहेर पडली होती. मात्र, ती शाळेतही गेली नाही आणि घरीही परतली नाही. यामुळे चिंताग्रस्त झालेल्या मुलीच्या वडिलांनी कणकवली पोलीस ठाण्यात आपल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून अपहरण केल्याची फिर्याद दिली होती.
कणकवलीचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. युवतीच्या वडिलांच्या मोबाईलचे लोकेशन आणि सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) तपासण्यात आले. मोबाईलचे लोकेशन हातखंबा येथे आढळताच, पीएसआय उल्हास जाधव आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रणाली जाधव यांच्या पथकाने तातडीने हातखंबा गाठले.
हातखंबा गावातील पानवल फाटा येथील संशयित मित्र दीपक माने याच्या घरात ती युवती आढळून आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या युवतीची दीपक मानेसोबत इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती आणि त्यातूनच ती त्याच्याकडे गेली होती. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.