Monday, October 26, 2026
spot_img
Home गुन्हेगारी ओणी हायस्कूल समोरून पार्क केलेली दुचाकी लंपास

ओणी हायस्कूल समोरून पार्क केलेली दुचाकी लंपास

राजापूर:- राजापूर तालुक्यातील ओणी हायस्कूल समोर पार्क केलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक संदीप दिनकर निचिते यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळचे सोळांकूर (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील रहिवासी असलेले संदीप निचिते (वय ४४) हे सध्या राजापूर तालुक्यातील ओणी येथील हायस्कूल समोरील साई विमलेश्वर हॉल परिसरात वास्तव्यास असून, ते राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपली काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस गाडी (क्रमांक MH ०९ GH ५१०३) नेहमीप्रमाणे साई विमलेश्वर हॉल समोर उभी करून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी, २४ ऑक्टोबर रोजी शनिवारची साप्ताहिक सुट्टी असतानाही कार्यालयातील महत्त्वाच्या कामासाठी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास ते बाहेर पडले असता, त्यांना आपली दुचाकी त्या ठिकाणी दिसून आली नाही.

गाडी चोरीला गेल्याचा संशय येताच त्यांनी तात्काळ ओणीचे पोलीस पाटील संजय लिंगायत तसेच आपले स्थानिक मित्र नामदेव नडे यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मित्र संग्राम भावके यांच्या मदतीने निचिते यांनी ओणी परिसर, पाचल फाटा तसेच ओणी बाजारपेठेत सर्वत्र शोध घेतला; मात्र दुचाकीचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सुमारे २० हजार रुपये किमतीची ही मोटारसायकल लबाडीने चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या तक्रारीच्या आधारे राजापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २७२/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. भरवस्तीतून आणि वर्दळीच्या ठिकाणाहून दिवसाढवळ्या दुचाकी चोरीला गेल्याने स्थानिक वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, राजापूर पोलीस या चोरीप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पुढील तपास करत आहेत.