रत्नागिरी:- तालुक्यातील आरे कदमवाडी परिसरात हरवलेल्या मांजरावरून सुरू झालेल्या साध्या शाब्दिक वादाचे पर्यवसान हिंसक हाणामारीत झाले असून, या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या मिळून १८ जणांच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ५ सप्टेंबर रोजी घडलेल्या या परस्परविरोधी घटनेमुळे परिसरात मोठी तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.
प्रसाद प्रकाश कदम (वय ३७, रा. कदमवाडी, आरे) आणि त्यांची पत्नी पूर्वा हे ५ सप्टेंबरच्या संध्याकाळी घराबाहेर त्यांचे हरवलेले मांजर शोधण्याबाबत चर्चा करत होते. यादरम्यान, शेजारील व्यक्तीने ती चर्चा ऐकून “आमचे मांजर मारले का?” अशी विचारणा करत वाद घातला. यातून सुरू झालेला वाद वाढत गेला आणि दोन्ही बाजूंचे लोक आमनेसामने आले.
तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्याकडे जात असताना चव्हाट्या जवळ पुन्हा वाद उफाळला. यावेळी झालेल्या हल्ल्यात आरोपींनी फिर्यादीवर कटर ब्लेडने वार केले, कपाळावर दगड मारून गंभीर दुखापत केली तसेच फिर्यादीच्या पत्नीला आणि भावाला लाथाबुक्क्यांनी व लाकडी बाक्याने मारहाण केली. या भीषण हाणामारीत प्रसाद कदम, पूर्वा कदम, पंकज कदम आणि प्रतिक्षा कदम हे चौघेजण जखमी झाले. या प्रकरणी फिर्यादी प्रसाद कदम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिपाली दिलीप कदम, विदेश भालचंद्र कदम, मयुरेश पांडुरंग आरेकर, संदेश मधुकर कदम, आदेश भालचंद्र कदम, सुष्मा मधुकर कदम, साक्षी सुरेश कदम, पल्लवी आदेश कदम, अस्मिता आनंद पेडणेकर, अपेक्षा भालचंद्र कदम, साहिल राम शिवलकर, सागर राम शिवलकर, आनंद पेडणेकर आणि रत्नकांत बाबराव मयेकर या १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याच वादादरम्यान कालभैरव मंदिर परिसरात भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या अस्मिता आनंद पेडणेकर (वय ५०) या महिलेला देखील मारहाण करण्यात आली. त्या दळण आणण्यासाठी जात असताना भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना बुक्क्यांनी, डोक्यावर प्रहार करत आणि काठीने मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात आली तसेच जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या प्रकरणी अस्मिता पेडणेकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रसाद कदम, पंकज कदम, दुर्वाक कदम आणि रक्षंदा पंकज कदम या चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
एकाच किरकोळ कारणावरून आणि हरवलेल्या मांजराच्या संशयावरून दोन गटांत झालेल्या या राड्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.









