Thursday, July 16, 2026
spot_img
Home दापोली आंजर्ले बंदरात दोन मासेमारी बोटी आगीच्या भक्ष्यस्थानी

आंजर्ले बंदरात दोन मासेमारी बोटी आगीच्या भक्ष्यस्थानी

दापोली:- तालुक्यातील आंजर्ले येथील तरीबंदर परिसरात सोमवारी रात्री आठ ते नऊच्या सुमारास उभ्या असलेल्या मासेमारी बोटींना लागलेल्या भीषण आगीत दोन बोटी पूर्णपणे जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे स्थानिक मच्छीमार बांधवांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सोमवारी रात्रीच्या सुमारास बंदराच्या किनारी उभ्या असलेल्या बोटींमधून अचानक आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि दोन बोटींना आपल्या विळख्यात घेतले. आग लागल्याचे समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. इतर बोटींना आगीचा विळखा बसू नये, यासाठी ग्रामस्थांनी युद्धपातळीवर प्रयत्न करत काही बोटी सुरक्षित ठिकाणी हलवल्या. स्थानिकांच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी, दोन बोटींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनास्थळी प्रशासनाकडून पाहणी करण्यात येत असून, नुकसानीचा अचूक आकडा अद्याप समोर आलेला नाही. आंजर्ले सारख्या शांत किनारी भागात घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक मच्छीमार भयभीत झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. प्रशासन या घटनेचा पुढील तपास करत आहे.