राजापूर:- राजापुरात एका अल्पवयीन युवतीला लॉजवर नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी कोदवली साईनगर पुनर्वसन वसाहतीतील लॉजचा मालक महंमद मुबारक ठाकूर (रा. मधीलवाडा राजापूर) याच्या विरोधातही कलम १७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मीडिया इंस्टाग्रामवर झालेल्या ओळख व मैत्रितून एका अल्पवयीन युवतीला शहरानजीकच्या कोदवली साईनगर येथील लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार करून त्याचे व्हिडिओ करून अन्यत्र व्हायरल करत तिची बदनामी केल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी एका अल्पवयीन युवकाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. १९ ऑगस्ट रोजी २०२६ सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान कोदवली साईनगर येथील एका लॉजवर हा प्रकार घडला होता. ७ सप्टेंबर रोजी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
याबाबत पीडितेच्या तक्रारीवरून या प्रकरणी तातडीने राजापूर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला होता. अशा प्रकारे काढण्यात आलेला व्हिडिओ अन्य कुणाकडे व्हायरल करण्यात आला, पुढे तो कोणी कोणी व्हायरल केला यादृष्टीने सर्व तांत्रिक बाबींचा आधार घेत तपास केला होता. व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी आणखी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याकडे आलेला तो व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी प्रणय सुधाकर जोशी (१८, रा. सागवे नाखरेवाडी), आर्यन नरेश व धुळप (१९, रा. सागवे चिंचाडी), सिध्देश सत्यवान कायंदेकर (२०, रा. सागवे कात्रादेवीवाडी) व यश गणपत आंबेरकर (२१, रा. सागवे कात्रादेवी वाडी) या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.









