रत्नागिरी:- ग्रामीण पोलीस ठाण्याच्या
हद्दीत घडलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी विजय प्रभाकर वैद्य याला न्यायमूर्ती मेहरोझ के. पठाण यांनी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि विशिष्ट अटींवर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सुरुवातीच्या तपासातील विसंगती आणि सुसाईड नोटमध्ये नावाचा थेट उल्लेख नसणे या बाबी अर्जदारासाठी दिलासादायक ठरल्या आहेत.
या प्रकरणी न्यायालयीन निर्णय वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, हे संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावरील वाद आणि कौटुंबिक वादातून उद्भवले होते. तक्रारदाराच्या अल्पवयीन मुलीचे आणि विजय वैद्य यांच्या मुलाचे प्रेमसंबंध होते. मात्र, मुलाने सोशल मीडियावर मुलीचे काही आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला होता. या घटनेत संबंधित मुलीने राहत्या घरी आत्महत्या केली होती.









