Thursday, July 30, 2026
spot_img
Home गुन्हेगारी अभ्युदयनगर येथे मोबाईल अपडेटच्या बहाण्याने अडीच लाखांची ऑनलाईन फसवणूक

अभ्युदयनगर येथे मोबाईल अपडेटच्या बहाण्याने अडीच लाखांची ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून एका भामट्याने मोबाईल सिस्टीम अपडेट होत असल्याचे भासवत मेडिकल सेल्समनची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नाचणे रोड परिसरातील अभ्युदयनगर येथे घडलेल्या या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभ्युदयनगर येथे राहणारे ३४ वर्षीय नारायण दिनेश घोलप हे २९ जुलै २०२६ रोजी सकाळी आपल्या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर अचानक सिस्टीम अपडेटची प्रक्रिया सुरू झाली. त्याच दरम्यान त्यांच्या फोनमध्ये ‘गूगल आयपीटीव्ही’ हे अज्ञात अ‍ॅप आपोआप डाऊनलोड झाले.

या अ‍ॅपच्या माध्यमातून सायबर चोरांनी त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळवला आणि आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरून पाच वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे अडीच लाख रुपये तसेच बचत खात्यावरून यूपीआयद्वारे ४ हजार २०० रुपये असा एकूण २ लाख ५४ हजार २०० रुपयांचा ऐवज परस्पर लांबवला.

मोबाइलमधून अचानक पैसे कट झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणाने तातडीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६(क), ६६(ड) आणि भा.द.वि. कलमानुसार गुन्हा नोंदवला असून, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. मोबाईलवर अचानक येणाऱ्या कोणत्याही संशयास्पद अपडेट किंवा लिंकवर क्लिक करू नये, तसेच प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअर व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणाहून एपीके फाईल्स डाऊनलोड करू नयेत.

मोबाईलमध्ये कोणतेही अनाहूत अ‍ॅप आल्यास तात्काळ इंटरनेट बंद करून बँक खाती ब्लॉक करावीत. फसवणूक झाल्यास नागरिकांनी तत्काळ १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर वा cybercrime.gov.in या पोर्टलवर संपर्क साधावा.