Tuesday, July 21, 2026
spot_img
Home गुन्हेगारी अडीच लाखांच्या दागिने चोरीप्रकरणी फरार मायलेकी दीड वर्षांनंतर पोलिसांच्या ताब्यात

अडीच लाखांच्या दागिने चोरीप्रकरणी फरार मायलेकी दीड वर्षांनंतर पोलिसांच्या ताब्यात

साखरपा:- साखरपा परिसरातील सुर्वेवाडी येथे घडलेल्या अडीच लाखांच्या चोरी प्रकरणातील फरार आरोपी असलेल्या मायलेकींना अखेर देवरुख पोलिसांनी ताब्यात घेतले. दीड वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या या संशयितांना अटक झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सुर्वेवाडीतील रहिवासी सरिता सुरेश सुर्वे यांनी आपल्या नातेवाईक आणि शेजारी असणाऱ्या अन्नपूर्णा दिगंबर बने (वय ५६) आणि त्यांची मुलगी शरयू दिगंबर बने (वय २५) यांच्यावर विश्वास ठेवून घराच्या चाव्या दिल्या होत्या. मात्र, याच विश्वासाचा गैरफायदा घेत या मायलेकींनी घरातून सुमारे अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुर्वे यांनी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून आणि अटकेच्या भीतीने या मायलेकी दीड वर्षांपूर्वीच गावातून फरार झाल्या होत्या.

गेल्या दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या दोघींचा शोध देवरुख पोलिसांचे पथक सातत्याने घेत होते.अखेर शनिवारी या मायलेकींना पोलिसांच्या जाळ्यात पकडण्यात यश आले. अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आता पोलीस कोठडीत या दोघींची सखोल चौकशी केली जाणार आहे. चोरीला गेलेला अडीच लाखांचा मुद्देमाल कोठे लपवला आहे आणि या कृत्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा छडा लावण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नामदेव जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.