रत्नागिरी:-खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल कंपनीकडून अॅग्रो केमिकल उत्पादने घेत तब्बल ९२ लाख रूपये पोबारा करणाऱ्या अशोक जैस्वाल (खांडवा- मध्यपदेश) याला येथील पोलिसांनी इंदोर येथून अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
अशोक जैस्वाल अशोक टेडर्स या फर्मद्वारे घरडा कंपनीची कृषी उत्पादने पुरवण्याचे काम अनेक वर्षे करत होता. 2018 पासून त्याने सातत्याने उत्पादनाची रक्कम थकवण्याचे प्रकार करू लागला. तब्बल 92 लाख रूपये थकवल्यानंतर कंपनीने वसुलीचा तगादा लावला असता त्याने चालढकल केली. अखेर कंपनीने पोलीस व जिल्हा न्यायालयात दाद मागितली. एपिल 2022 मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. मात्र पोलिसांना त्याने गुंगारा दिला. पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे, हेडकॉन्सटेबल विशाल धाडवे, सुनील पाडळकर यांचे पथक काही दिवसांपूर्वी पुन्हा मध्यपदेशमध्ये गेले होते. इंदोर रेल्वेस्थानकानजीक पोलिसांच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.









