झाडगावचे ‘काल भैरव-जोगेश्वरी गोविंदा पथक’ दहीहंडीसाठी तयारी
रत्नागिरी:- गोविंदा आला रे आला…! या जयघोषाने आणि दहीहंडीच्या उत्साहाने रत्नागिरी शहर दुमदुमले असून, झाडगावच्या नामांकित काल भैरव-जोगेश्वरी गोविंदा पथकाने यंदाच्या दहीहंडी उत्सवासाठी जय्यत तयारी केली आहे. सलग दोन वर्षे सातव्या थराला यशस्वी सलामी देणाऱ्या या पथकाने यंदाही मैदानात उतरण्यासाठी कंबर कसली असून, यंदा अवघ्या ७ वर्षांची बालगोविंदा अन्वी कोलगे सातव्या थराला सलामी देण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या या धाडसी कामगिरीकडे संपूर्ण रत्नागिरीचे लक्ष लागले आहे.
दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री काल भैरव-जोगेश्वरी गोविंदा पथकाच्या टी-शर्ट ओपनिंगचा दिमाखदार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. ढोल-ताशांचा निनाद, गोविंदांचा दणदणाट आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण झाडगाव परिसरात चैतन्यमय वातावरण पाहायला मिळाले.
झाडगावचे युवा नेतृत्व शुभम साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक यंदा मैदानात उतरत आहे. मागील दोन वर्षांची सात थरांची परंपरा कायम राखत यंदा आणखी काहीतरी नवीन आणि नेत्रदीपक थरार दाखवण्याचा या गोविंदा पथकाचा निर्धार आहे.
टी-शर्ट ओपनिंगच्या या दिमाखदार सोहळ्याला मनु गुरव, स्मित साळवी, नानू सावंत, रुपेश सावंत, नाना बाणे, संतोष साबळे, पाटील हेमंत, बंटी गुरव, रुपेश साळवी, किरण सावंत यांच्यासह झाडगावमधील प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि गोप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदाच्या दहीहंडी सोहळ्यात झाडगावच्या या पथकाचा थरार आणि चिमुकली अन्वी कोलगे कशी कामगिरी करते, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.









