खेड:- अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीसह महिलेला ब्लॅकमेल करत ६८ लाख रूपयांची खंडणी उकळणाऱ्या अटकेतील गुलाम मोहिद्दीन रफिक परकार (३२, रा. साखरोली-खेड) या संशयिताची येथील पोलिसांनी बँक खातीही गोठवली आहेत. संशयिताने उकळलेल्या रक्कमेचे सौदी अरेबियातच वितरण केल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या खात्यात अडीच लाख रूपये शिल्लक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पीडित महिलेला ३० लाख रूपये परत केल्याचे तपासाअंती उघड झाले आहे.
एका महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत संशयिताने वेळोवेळी ऑनलाईनद्वारे ६८ लाख रूपये खंडणी गोळा केली. एवढी रक्कम देवूनही पैशासाठी संशयिताचा तगादा सुरूच ठेवल्याने पीडित महिलेने येथील पोलीस ठाणे गाठत रितसर तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने संशयिताच्या मुंबईत शिताफीने मुसक्या आवळत खंडणी प्रकरणाचा छडा लावला.









