१ कोटीचा नवा सीसी टीव्ही प्रकल्प ; गुन्हेगारीला चाप
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरावर सीसीटीव्हीद्वारे पाळत ठेवून शहर सुरक्षित ठेवण्याचा महत्त्वाकांशी प्रकल्प जिल्हा पोलिस दलाने हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत शहरात ५७ ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. गर्दीची ठिकाणे, चौक, प्रवेशद्वार, चेकपोस्ट, किनारपट्टीवरील लॅंडिंग पॉइंट आदी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. १ कोटीचा हा प्रकल्प असून पोलिस नियंत्रण कक्षातच त्याचे नियंत्रण असणार आहे.
कोकण परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते नुकतेच या प्रकल्पाचे उद्धाटन झाले. या वेळी पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई आदी वरिष्ठ पोलिस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. सीसीटीव्ही सेफ सिटी सर्व्हिलन्स प्रकल्प असे त्याचे नाव आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक गर्ग यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबवला जाणार आहे. रत्नागिरी शहर सुरक्षित ठेवण्याच्या अनुषंगाने याची रचना असणार आहे. पोलिस दलाने त्यासाठी संपूर्ण शहराची पाहणी केली. रत्नागिरी शहरात येण्यासाठी असलेले प्रवेशद्वार, सार्वजनिक तसेच गर्दीची ठिकाणे, काही संवेदनशील भाग, गल्ल्या, चौक, चेकपोस्ट निश्चित केली आहेत तसेच किनापट्टी भागावरही जास्त लक्ष केंद्रित केले आहे. समुद्रमार्गे शहरात सहज प्रवेश करता येऊ नये यासाठी मिरकरवाडा बंदर, जेटी, काही लॅंडिंग पॉइंट या भागातही सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.
जिल्हा नियोजनमधून त्यासाठी १ कोटीचा निधी पोलिस दलाला मिळाला आहे. यातून हे ५७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया झाली असून मुंबईच्या एका एजन्सीने याचे काम घेतले आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर पुढील दोन वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी या एजन्सीवर राहणार आहे. या प्रकल्पामुळे शहरात गुन्हेगारी, अवैध धंदे, आंदोलने, मोर्चा, वादविवाद आदींवर पोलिसांना पाळत ठेवणे शक्य होणार आहे. सीसीटीव्हीचा वॉच असल्याने गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिस दलाने व्यक्त केला.