Sunday, May 24, 2026
spot_img
Home चिपळूण ४ पानांची चिठ्ठी लिहून बँक कर्मचारी बेपत्ता

४ पानांची चिठ्ठी लिहून बँक कर्मचारी बेपत्ता

चार जणांवर ब्लॅकमेलिंगचा आरोप

चिपळूण:- चिपळूण तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. बँक कर्मचारी असलेल्या 33 वर्षीय युवकाने पोलिसांसाठी चार पानांचे पत्र लिहून तो बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुकुंद मुरलीधर पालांडे असे बेपत्ता झालेल्या बँक कर्मचाऱ्याचे नाव असून तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या वडिलांकडून पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी बँकेच्या चिपळूण शाखेत कार्यरत असलेल्या हा युवक शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यापासून बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. चिपळूण तालुक्यातील आलोरे गावचा रहिवासी असलेल्या मुकुंद याने चिपळूण पोलीस निरीक्षकांना माहिती देण्यासाठी एक चार पानी पत्र लिहिले आहे. त्यामध्ये काही नावांचाही समावेश आहे, त्यामध्ये चार जणांच्या नावाचा समावेश असून या चार जणांना त्याने आपल्या आत्महत्येस जबाबदार धरल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. चिपळूण शहरातील वीरेश्वर तलाव परिसरात आपल्याला चार जणांनी मारहाण केल्याचा उल्लेख करत ओळखीच्या पोलिसांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटविण्यात आले, असाही उल्लेख करण्यात आला आहे.

आपल्याला ब्लॅकमेलिंगच्या मानसिक त्रासामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख तरुणाने या पत्रात केला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा कोळकेवाडी धरण परिसरात बेपत्ता झालेल्या मुकुंद यांची दुचाकी आढळून आली आहे. शुक्रवारी रात्रीही तात्काळ शोधमोहीम राबवण्यात आली. शनिवारी सकाळपासून पुन्हा पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिरगाव पोलिस निरीक्षक भरत पाटील यांच्या पथकाने शोधकार्य बोटीच्या सहाय्याने सुरू केलं आहे. मुकुंद पालांडे यांचा शोध घेण्यात अद्याप पोलिसांना यश आलं नसून चिपळूणचे पोलीस निरीक्षक श्री. नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात शोधमोहीम सुरू आहे.