३२ हजार ३९८ बागायतदारांनी उतरवला विमा

रत्नागिरी:- वातावरणातील बदलाला सामोरे जाण्यासाठी विम्याचे महत्व बागायतदारांच्या लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे यंदा ३२ हजार ३९८ आंबा व काजू शेतकर्‍यांनी विमा उतरवला असून त्यात २६ हजार ५१८ आंबा बागायतदार आहेत. गतवर्षी विक्रमी ९४ कोटी ४१ लाख विमा परतावा शेतकर्‍यांना मिळाला होता. गतवर्षीच्या तुलनेत सव्वा सहा हजार अधिक बागायतदारांनी विमा योजनेला प्रतिसाद दिला आहे.

जिल्ह्यात एकूण ६५ महसुली मंडळे असुन त्यात पंधराशेहून अधिक गावे आहेत. २६ हजार ६११ बागायतदारांच्या १४७३२.८९ हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरविला होता. त्यात २२ हजार ३८० आंबा बागायतदार तर ४ हजार २३१ काजू बागायतदार होते. यंदा विमा उतरवणार्‍यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यंदा ३२ हजार ३८९ एकुण शेतकर्‍यांनी विमा उतरवलेला आहे. त्यातील २६ हजार ५१८ आंबा तर ५ हजार ८८० काजू बागायतदार आहेत. विमा घेणार २८ हजार २५१ कर्जदार असून ४ हजार १४७ बिगर कर्जदार शेतकरी आहेत. विमा हप्त्यापोटी शेतकर्‍यांनी २० कोटी ८५ लाख रुपये भरले आहेत. सर्वाधिक विमा रत्नागिरी, संगमेश्‍वर तालुक्यातील शेतकर्‍यांचा प्रतिसाद मिळाला. तर सर्वात कमी गुहागर तालुका आहे. गतवर्षी विमा उतरवलेल्या शंभर टक्के बागायतदारांना परतावा मिळाला. मागील दहा वर्षांच्या तुलनेत विक्रमी परतावा असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

फयान चक्रीवादळानंतर पुढे बिघडलेल्या वातावरणाचा परिणाम हापूसवर होत आहे. उत्पादनात होणारी घट आंबा बागायतदारांसाठी चिंताजनक ठरली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने उत्पन्नावरही परिणाम होत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये अरबी समुद्रात चक्रीवादळं तयार होऊ लागल्याने परिणामांची तिव्रता वाढली आहे. लांबलेला पाऊस, किमान तापमानाचा घटलेला कालावधी, अवकाळी पाऊस आणि अचानक तापमानात होणार्‍या वाढीमुळे फळगळीचे संकट हापूसवर आहे. मागील दोन वर्षात फळमाशीचा प्रचंड प्रादुर्भाव झाला होता. या बदलांना सामोरे जातानाच नुकसान टाळण्यासाठी बागायतदारांकडून विमा उतरवण्यावर भर दिला जात आहे. तसेच कराराने बागा घेणार्‍यांनाही विमा उतरवण्याची सुट मिळाल्याने संख्यात्मक वाढ झाल्याचेही अनेकांचे मत आहे.