Tuesday, June 16, 2026
spot_img
Home संगमेश्वर १५ दिवसांपासून बेपत्ता वृद्धेचा मृतदेह जंगलात आढळला

१५ दिवसांपासून बेपत्ता वृद्धेचा मृतदेह जंगलात आढळला

संगमेश्वर:- तालुक्यातील कोळंबे परिसरातील पुरक सडा येथील जंगलात १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका वृद्ध महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, द्रौपदी पांडुरंग पडवळ (वय ७५, रा. कोळंबे भरणकरवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या विसरभोळेपणाच्या आजाराने त्रस्त होत्या. ३१ मार्च रोजी सकाळी सुमारास त्या घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्या परत न आल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला; मात्र काहीच ठसे लागत नसल्याने त्याच दिवशी संगमेश्वर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी (दि. १६ एप्रिल) सकाळी साडेदहाच्या सुमारास कोळंबे पुरक सडा येथील दाट झाडीमध्ये एक मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिकांकडून पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर पंचनामा करण्यात आला. मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर तो बेपत्ता असलेल्या द्रौपदी पडवळ यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.