दापोलीत मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
दापोली:- हॉटेल बंद असल्याच्या आणि बार सुरू आहे का असे विचारल्यानंतर नाही उत्तर दिल्याच्या रागातून एका ग्राहकाने व त्याच्या साथीदारांनी मिळून हॉटेल चालकावर जीवे मारण्याच्या इराद्याने लोखंडी जॅकच्या रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना दापोली तालुक्यातील वळणे येथे घडली. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास दापोली तालुक्यातील वळणे येथील हॉटेल व्होल्गा येथे हा प्रकार घडला. फिर्यादी महादेव लाया दोरकलकर (वय ४०, रा. हर्णे मलखांब पेठ, ता. दापोली, सध्या रा. वळणे) हे आपल्या हॉटेलवर असताना त्यांची पत्नी सुप्रिया आणि मुलगी कशिश हे देखील सोबत होते. यादरम्यान एक चारचाकी गाडी हॉटेलच्या गेटमध्ये आली. त्यातील आरोपींनी फिर्यादींना ‘बार चालू आहे का?’ अशी विचारणा केली. फिर्यादींनी ‘नाही’ असे सांगितल्याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली.
यानंतर आरोपींनी गाडी गेटच्या बाहेर नेऊन, गाडीवरील चालक अंकित जाधव (रा. तेरेवायंगणी, ता. दापोली) याने गाडीचा जॅक काढण्याचा लोखंडी रॉड बाहेर काढून फिर्यादीच्या डाव्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. तसेच सोबत असलेला दुसरा आरोपी सुमेध रूखे आणि एका अन्य अज्ञात इसमाने फिर्यादी व त्यांच्या पत्नीला व मुलीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या हल्ल्यात फिर्यादी महादेव दोरकलकर हे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून मिळालेल्या एम.एल.सी. अहवालावरून १५ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ३५१(२), ३५२, ३(५) नुसार अंकित जाधव, सुमेध रूखे आणि एक अज्ञात इसम (सर्व रा. तेरेवायंगणी, ता. दापोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









