Monday, October 5, 2026
spot_img
Home रत्नागिरी हापूससह आंब्याच्या प्रमुख जातींची स्वतंत्र नोंद

हापूससह आंब्याच्या प्रमुख जातींची स्वतंत्र नोंद

ई-पीक पाहणीत स्वतंत्र नोंद करण्याचा मार्ग मोकळा

रत्नागिरी:- कोकणची ओळख असलेल्या हापूस आंब्याची ई-पीक पाहणीत स्वतंत्र नोंद करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ‘डीसीएस’ ॲपमध्ये हापूससह महाराष्ट्रातील आंब्याच्या प्रमुख जातींचे स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

चालू वर्षी ई-पीक पाहणीसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘डीसीएस’ ॲपमध्ये आंबा पिकाची नोंद करताना हापूस, केशर, रत्ना, सिंधू आणि पायरी या प्रमुख जातींसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध नव्हते. त्यामुळे हापूस आंब्याची नोंद ‘कोकण रुची’ या पर्यायाखाली करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. यामुळे प्रत्यक्ष लागवडीखाली असलेल्या आंब्याच्या विविध जातींची अचूक नोंद होण्यात अडचणी निर्माण होत होत्या.

या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार डीसीएस ॲपमध्ये हापूस, केशर, रत्ना, सिंधू आणि पायरी या आंब्याच्या प्रमुख जातींसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय काजू, नारळ आणि सुपारी या फळपिकांच्या विविध जातींचीही स्वतंत्र नोंद करता यावी, यासाठी आवश्यक पर्याय समाविष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ई-पीक पाहणीतील अचूक नोंदींना पीक नुकसानभरपाई, पीक विमा, विविध शासकीय योजनांचे लाभ आणि कृषी नियोजनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. हापूस आंब्याची स्वतंत्र नोंद झाल्यामुळे भविष्यात शासकीय आकडेवारीत कोकणातील हापूस लागवडीचे प्रत्यक्ष क्षेत्र स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

डीसीएस ॲपद्वारे शेतकऱ्यांना पिकांची नोंद छायाचित्र आणि जीपीएस लोकेशनसह करता येते. नव्या सुविधेची अंमलबजावणी झाल्यानंतर हापूससह अन्य प्रमुख आंबा जातींची नोंद त्यांच्या स्वतंत्र नावाने करता येणार असल्याने कोकणातील आंबा उत्पादकांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे.