अवकाळीच्या भीतीने दरात घसरण; बाजारपेठेत लाखोंची उलाढाल!
चिपळूण:- अवकाळी पावसाच्या भीतीने डझनावर विकला जाणारा हापूस आंबा आता शेकड्यावर विकला जात आहे. ४ हजारापासून ६ हजार रुपये शेकडापर्यंत हापूसला दर मिळत आहे.
चिपळूण शहरातील गुहागर नाका आणि भेंडीनाका परिसरात चार ते पाच हजार नग आंब्याची विक्री होत आहे. यातून लाखोंची उलाढाल या परिसरात होत आहे.
तालुक्याच्या खाडीपट्टा भागातील आंबा येथे विक्रीसाठी येत आहे. येथे आंबा खरेदीसाठी चिपळूण, गुहागर, संगमेश्वर भागातील ग्राहक आणि विक्रेते येत आहेत. गुहागर नाका आणि भेंडीनाका हे दोन्ही नाके गुहागरकडे जाणाऱ्या रस्त्यावर येतात. सुटीच्या काळात गुहागरकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. त्यामुळे गुहागरमधून पर्यटनाचा आनंद घेऊन परतीच्या मार्गावर असलेले पर्यटक या नाक्यावर थांबतात आणि आंब्याची खरेदी करून घरी परततात. त्यामुळे आंबाविक्रीसाठी हे नाके प्रसिद्ध झाले आहेत. रत्नागिरीतील पावस, गणपतीपुळे आणि दापोली भागातील आंबा बागायतदारसुद्धा येथे आंबाविक्रीचे स्टॉल लावत आहेत.
निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका यंदा हापूस आंबा उत्पादनाला बसला. संपूर्ण तालुक्यात चार हजार हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीचे आहे. यातील केवळ दहा टक्के क्षेत्रावरच यावर्षी हापूस आंब्याचे उत्पादन झाले. गेल्या वर्षी आंब्याचे उत्पादन साधारण ४० टक्के होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत आंब्याचे उत्पादन तब्बल ३० टक्क्यांनी घटले. उत्पादनातील या त्रुटीमुळे सुरुवातीला बाजारपेठेत हापूसच्या भावात मोठी वाढ झाली. गेल्या वर्षी शेवटच्या हंगामात पाचशे ते सातशे रुपये डझन दराने मिळणारा आंबा यावर्षी थेट १५०० ते १७०० रुपये डझन या दराने विकला जाऊ लागला. आखाती देशातील युद्धामुळे हापूस आंब्याचे दर कमी होईल, असे वाटत होते; परंतु आंब्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे दरात मोठी वाढ झाली. आता आंब्याचा दर हळूहळू कमी होऊ लागला. शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची भीती आहे. बागांमध्ये सध्या आंबा तयार झाला आहे तो बाजारपेठेत गेला नाही आणि त्याच दरम्यान पाऊस झाला तर आंब्याला दर मिळणार नाही, या भीतीने बागायतदार आता बाजारपेठेत शेकडा दराने आंबा विकत आहेत. लहान फळ साडेतीन हजार रुपये शेकडा आणि मोठे फळ पाच ते सहा हजार रुपये शेकडा या दराने चिपळूणमध्ये आंब्याची विक्री सुरू आहे.









