Monday, October 5, 2026
spot_img
Home रत्नागिरी हातखंबा-रत्नागिरी मार्गावर बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

हातखंबा-रत्नागिरी मार्गावर बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- हातखंबा ते रत्नागिरी जाणारे महामार्गावर वाहतुकीच्या नियमांना बगल देऊन आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने विरुद्ध दिशेने दुचाकी चालवणाऱ्या दोन वेगवेगळ्या चालकांवर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ३ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

३ ऑक्टोबर रोजी रात्री ८:२५ वाजण्याच्या सुमारास हातखंबा ते रत्नागिरी जाणाऱ्या महामार्गावर हा प्रकार घडला. आरोपी गौरव सुभाष पाचकुडे (वय २४, मूळ रा. करबुडे, मावळती पाचकुडेवाडी, ता. व जि. रत्नागिरी) हा त्याच्या ताब्यातील होंडा कंपनीची डिओ मोटारसायकल (क्र. एमएच ०८ एयू १२७२) ही रत्नागिरी ते हातखंबा अशा विरूद्ध दिशेने (रोंग साईडने) अत्यंत बेदरकारपणे चालवत होता. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या इतर वाहनांना मोठा अडथळा व धोका निर्माण झाला होता. या प्रकरणी पोलीस नाईक प्रविण कल्लापा पाटील यांनी फिर्यादी दिली असून, रात्री १०:५८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

​याच रात्री ८:४० वाजण्याच्या सुमारास, याच महामार्गावर अशाच प्रकारे धोकादायक पद्धतीने गाडी चालवणारा आणखी एक तरुण पोलिसांच्या निदर्शनास आला. आरोपीओंकार अनिल आपकरे (वय २१, मूळ रा. पानवल, आपकरेवाडी, ता. व जि. रत्नागिरी) हा त्याची होंडा डिओ मोटारसायकल (क्र. एमएच ०८ एआर ४८८९) ही रत्नागिरी ते हातखंबा अशा विरूद्ध दिशेने भरधाव व बेदरकारपणे चालवून वाहतुकीस धोका निर्माण करत होता. या प्रकरणी सपोफौ विकास भगवान चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ११:२७ वाजता दुसरा गुन्हा नोंदवण्यात आला.
​या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी आरोपी चालकांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१ अन्वये गुन्हे दाखल केले असून, ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.