हातखंबा दर्ग्याजवळ साखरेचा ट्रक दीडशे फूट दरीत कोसळला; अपघातात दोघेजण जखमी

रत्नागिरी:- मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंबा येथील दर्ग्याजवळील (गुरववाडी) तीव्र उतारावर साखरेने भरलेला ट्रक दीडशे फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. शिवाजी श्रीरंग शिंदे (३२, रा. मंगळवेढा, जि. सोलापूर) व क्लिनर दादा मनोहर मेटकरे (२७,सोलापूर ) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.

 सविस्तर वृत्त असे की, सोलापूर, मंगळवेढा मार्गे जयगडला साखरेच्या गोणी भरलेला ट्रक चालला होता.  सकाळी 11.30 वाजण्याच्या हातखंबा येथील दर्ग्याजवळ ब्रेक फेल झाल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुमारे दीडशे फूट खाली दरीत ट्रक कोसळला. या अपघातात चालक आणि ड्रायव्हर जखमी झाले आहेत. जखमींना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या हातखंबा येथील  रुग्णवाहिकेतून रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच हातखंबा चेक पोस्टचे  सपोनि श्री. विक्रमसिंग पाटील, पोहवा महेंद्र ठोंबरे, बाजीराव निरटे, संकेत संसारे दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली. या अपघातातील ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातील साखरेची पोती रस्त्यावर अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली आहेत.