कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी
दापोली:- तालुक्यातील हर्णे येथील ऐतिहासिक गोवा किल्ल्याची तटबंदी मुसळधार पावसाने कोसळल्याची घटना समोर आली असून, किल्ल्याच्या संवर्धनासाठी खर्च करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गोवा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तसेच मराठा आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला ऐतिहासिक वारसा आहे. कोकणातील महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांपैकी एक असलेल्या या किल्ल्याला वर्षभर राज्यासह देशभरातून हजारो पर्यटक आणि इतिहासप्रेमी भेट देतात. त्यामुळे या किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, नुकतेच पूर्ण झालेल्या कामानंतर अल्पावधीतच तटबंदी कोसळल्याने संवर्धनाच्या कामाची गुणवत्ता आणि संबंधित यंत्रणांच्या देखरेखीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते, एवढ्या मोठ्या निधीतून करण्यात आलेले काम जर पहिल्याच मुसळधार पावसात टिकू शकत नसेल, तर कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले का, तांत्रिक निकषांचे पालन झाले का आणि कामाची गुणवत्ता तपासण्यात हलगर्जीपणा झाला का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. या प्रकरणात संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. तटबंदी कोसळल्याने किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ढासळलेल्या भागाभोवती तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करून पर्यटकांना धोकादायक भागात जाण्यापासून रोखावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तसेच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पाहणी करून किल्ल्याच्या उर्वरित तटबंदीचीही तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.









