Monday, July 6, 2026
spot_img
Home दापोली म्हाप्रळ-आंबेत पुलाला २ बार्जची धडक; पुलावरील वाहतूक बंद

म्हाप्रळ-आंबेत पुलाला २ बार्जची धडक; पुलावरील वाहतूक बंद

दापोली:– रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री खाडीवरील महत्त्वाच्या म्हाप्रळ-आंबेत पुलाला रविवारी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास वाळू वाहतूक करणाऱ्या दोन बार्जची जोरदार धडक बसली. या घटनेनंतर पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद केली आहे.

धडकेनंतर दोन्ही बार्ज पुलाजवळ अडकून पडल्याने पुलाच्या संरचनेला संभाव्य धोका निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित पोलीस प्रशासनाला पुलावरील वाहतूक तत्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या. सार्वजनिक बांधकाम उपविभाग, माणगावचे उपअभियंता यांनी मंडणगड आणि गोरेगाव पोलीस ठाण्यांना अधिकृत पत्र पाठवून पुलाजवळील मार्ग तात्पुरता बंद करण्याची विनंती केली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माहितीनुसार, राज्य महामार्ग क्रमांक १०१ वरील सावित्री खाडीवरील सुमारे ३७६ मीटर लांबीचा आंबेत पूल रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा आहे. पुलावरील वाहतूक बंद झाल्याने दोन्ही जिल्ह्यांतील संपर्क तात्पुरता खंडित झाला असून पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच महसूल, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पुलाच्या संरचनात्मक सुरक्षिततेची तपासणी सुरू असून अडकलेले बार्ज हटविण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. तपासणी पूर्ण झाल्यानंतरच पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक आधीच प्रभावित झाली आहे. त्यात म्हाप्रळ-आंबेत पूलही बंद झाल्याने कोकणात ये-जा करणारे प्रवासी, स्थानिक नागरिक आणि मालवाहतूक वाहनांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने नागरिकांना विनाकारण या मार्गावर गर्दी टाळण्याचे आणि पुढील सूचना मिळेपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. पुलाची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्याने तपासून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.