मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील सोवेली येथे एका धक्कादायक घटनेत ७० वर्षीय वृद्धास शिवीगाळ करत त्यांच्यावर सामूहिक जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर घटनेची दखल घेत मंडणगड पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ मार्च रोजी घडलेल्या या घटनेबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर १३ नोव्हेंबर रोजी गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली असून, २५ नोव्हेंबर रोजी संशयितांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, सोवेली येथील रहिवासी अशोक अनंत दळवी (वय ७०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक १५ मार्च रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास फिर्यादी, त्यांचे कुटुंबीय आणि इतर ग्रामस्थ गावातील सुशील दळवी यांच्या अंगणात बसले होते. त्यावेळी संशयित आरोपी विश्वनाथ पांडुरंग दळवी हे मद्यधुंद अवस्थेत तेथे आले. त्यांच्यासोबत एकनाथ पांडुरंग दळवी, रविंद्र पांडुरंग दळवी, प्रताप सुरेश दळवी, नंदकुमार सुभाष दळवी आणि अमेय विश्वनाथ दळवी (सर्व रा. सोवेली) हे देखील होते. या जमावाने अचानक फिर्यादी अशोक दळवी यांना लक्ष्य करत विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
आरोपींनी केवळ शाब्दिक बाचाबाची न करता अत्यंत अवमानकारक शब्द वापरत वृद्धावर जीवघेणा हल्ला चढवला. यावेळी त्यांना खुर्चीसकट मागे ढकलून देण्यात आले, ज्यामुळे फिर्यादी यांच्या हाताला दुखापत झाली व मुका मार लागला. गावात गुंडगिरी व दहशत माजवणाऱ्या या प्रवृत्तीविरोधात फिर्यादींनी पोलीस प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, मंडणगड पोलिसांनी १३ नोव्हेंबर रोजी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १८९(२), ३२४(४), ३५१(२) आणि ३५२ अन्वये वरील सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
सदर प्रकरणाचा अधिक तपास मंडणगड पोलीस करत आहेत. या संदर्भात संबंधितांना २५ नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र, केवळ चौकशी करून हे प्रकरण सोडून न देता, गावात दहशत माजवणाऱ्या आणि ज्येष्ठ नागरिकांवर हात उचलणाऱ्या या समाजकंटकांवर पोलिसांनी कडक व रितसर कारवाई करावी, अशी मागणी फिर्यादी व ग्रामस्थांकडून केली जात आहे.









