सोमेश्वर येथे पूर्ववैमनस्यातून दोन बकऱ्यांचा घेतला जीव

रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर येथे पूर्ववैमनस्य व वारंवार होणारे वाद यामुळे दोन बकऱ्याना आपला जीव गमवावा लागला आहे. आपल्यावर दाखल केलेल्या तक्रारीचा राग मनात ठेवून त्यांच्या दोन बकऱ्याची मान पिरगळून ठार केले. ही घटना 24 ते 25 जुलै 2023 या दरम्यानच्या काळात घडली. या प्रकरणी संशयित तरूणाविरूद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुबीन इस्माईल सोलकर (रा सोमेश्वर मोहल्ला) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व आरोपी यांच्यात मागील काही वर्षापासून वाद सुरू आहे तक्रारदार महिलेने यापूर्वी मुबीन सोलकर याच्याविरूद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. त्यानुसार मुबीन सोलकर याच्याविरूद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा राग मुबीन याच्या मनात धुमसत होता.

ग्रामीण पोलिसांत तकार दाखल केल्याच्या रागातून मुबीन व तक्रारदार यांच्यात मागील काही वर्षापासून सातत्याने वाद होत होता. काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा तक्रारदार व मुबीन सोलकर यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. याच रागातून मुबीन याने 24 ते 25 जुलै 2023 च्या दरम्यान सोमेश्वर चिधींचा बाग येथे तक्रारदार यांच्या बकऱ्यांच्या गोठ्याचे कडी कुलूप तोडून आत प्रवेश केला यावेळी मुबीन याने बकऱ्याची मान पिरगळून त्यांना ठार मारले, अशी तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल करण्यात आली.