रत्नागिरी:- एप्रिल महिन्यात सुटीच्या कालावधीत घरे बंद राहतात तसेच सुटीत बाहेरगावी, फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. याच गर्दीचा गैरफायदा घेत चोरटे घरफोडी किंवा गर्दीत दागिने, रोकड तसेच मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारण्याची संख्या अधिक आहे. सध्या ऑनलाईन फसवणूक वाढली आहे. विविध प्रकारचे फंडे वापरून फसविले जाण्याचा घटना अधिक आहेत. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात अशा १३ घटना घडल्या आहेत. या कालावधीत गर्दीचा गैरफायदा घेत महिलांची छेडछाड, विनयभंग तसेच बलात्काराचे १३ गुन्हे जिल्ह्यांत एप्रिल महिन्यात दाखल झाले आहेत.
विविध कारणांवरून झालेल्या वादांचे मारामारीत पर्यवसान झाल्याने असे १२ गुन्हे या एका महिन्यात दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात विविध प्रकारच्या चोरीच्या ३६ घटना घडल्या आहेत. यात प्रवासादरम्यान दागिने, रक्कम चोरी, घरफोडी तसेच वाहनचोरी आदी चोरींच्या घटनांचा समावेश आहे.
सुटीच्या कालावधीत नागरिक बाहेरगावी किंवा पर्यटनासाठी घर बंद करून जातात. घर बंद असेल तर चोरट्यांचे चांगलेच फावते. घरात आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. नागरिकांनी परगावी जाताना घराला मजबूत कुलूप लावून जावे. शेजारीही कल्पना द्यावी. लगतच्या पोलिस स्टेशनला कल्पना दिल्यास गस्तीच्या वेळी लक्ष ठेवले जाईल. योग्य खबरदारी घेण्याने चोरी होण्याला आळा बसेल.