Sunday, June 7, 2026
spot_img
Home रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलसमोर रिक्षा- ॲम्ब्युलन्सचा अपघात; रिक्षाचालकासह महिला प्रवासी जखमी

सिव्हिल हॉस्पिटलसमोर रिक्षा- ॲम्ब्युलन्सचा अपघात; रिक्षाचालकासह महिला प्रवासी जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शनिवारी एक मोठी दुर्घटना टळली. एका बेजबाबदार कार चालकाने गर्दीच्या वेळी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटले आणि रिक्षा रुग्णालयासमोर उभ्या असलेल्या ‘राजा ॲम्ब्युलन्स’वर जाऊन वेगाने आदळली. या भीषण अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून, रिक्षाचालक आणि एक महिला प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर नेहमीप्रमाणे वाहनांची आणि नागरिकांची मोठी वर्दळ सुरू होती. याच गर्दीच्या वेळी बाजूने येणाऱ्या एका कार चालकाने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत अचानक रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. कार अचानक समोर आल्यामुळे रिक्षाचालकाचा गाडीवरील ताबा सुटला. अनियंत्रित झालेली रिक्षा रुग्णालयाबाहेर पार्क करून ठेवलेल्या ‘राजा ॲम्ब्युलन्स’ (MH 08 AP 3003) वर जाऊन थेट धडकली.

धडक इतकी जोरदार होती की रिक्षाच्या समोरील भागाचा आणि काचेचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन रिक्षातील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात रिक्षाचालक आणि रिक्षात प्रवास करणारी एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. सुदैवाने रुग्णालयासमोरच ही घटना घडल्यामुळे जखमींना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळणे सोपे झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, रुग्णालयांसारख्या संवेदनशील आणि वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे बेदरकारपणे ओव्हरटेक करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.