रत्नागिरी:- मुंबई-गोवा हायवेवर सावर्डे येथील हिवेन हॅप्पी पंजाबी धाब्यासमोर दुचाकीचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये चालक गंभीर जखमी झाला आहे. वेगात असलेल्या दुचाकीने रस्त्याच्या कडेला असलेल्या जाहिरातीच्या फलकाला जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला. १० मार्च रोजी सकाळी पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेय जगन्नाथ बोल्ये (वय २२, रा. शिवडी, मुंबई) हा आपल्या ताब्यातील युनिकॉर्न दुचाकी (क्र. एमएच ४७ सीबी ०७८८) घेऊन मुंबईहून राजापूरच्या दिशेने जात होता.
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे हिवेन हॅप्पी पंजाबी धाब्यासमोर आले असता, अमेयचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट रस्त्याशेजारील जाहिरातीच्या बोर्डवर जाऊन आदळली. या धडकेत चालक अमेय बोल्ये याला गंभीर दुखापत झाली असून, दुचाकीच्या पाठीमागे बसलेला यश सहदेव बोल्ये (वय २४, रा. ताम्हाणे, राजापूर) हा देखील जखमी झाला आहे.या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गगनेश चंद्रकांत पटेकर यांनी फिर्याद दिली असून, चालक अमेय बोल्ये याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२५(अ), ११५(३), २८१ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सावर्डे पोलीस करत आहेत.









