Wednesday, May 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी सावर्डे येथे गाडी आडवून प्रौढाला बेदम मारहाण

सावर्डे येथे गाडी आडवून प्रौढाला बेदम मारहाण

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या सावर्डे वहाळफाटा येथे क्षुल्लक कारणावरून गाडी आडवून चालकाला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आपल्या वॅगनआर गाडीतून जाणाऱ्या एका व्यक्तीची गाडी अडवून, त्याला गाडीबाहेर खेचत दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना २५ डिसेंबरच्या रात्री घडली असून, याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९.०० वाजण्याच्या सुमारास सावर्डे वहाळफाटा येथील ‘तरंग बिअर शॉपी’ समोर घडली. फिर्यादी विनायक अनंत कदम (वय ४४, रा. खांडोत्री देवूळवाडी, ता. चिपळूण) हे आपल्या वॅगनआर गाडीने मुंबई-गोवा रोडवरून आपल्या गावी खांडोत्री येथे जात होते. ते वहाळफाटा येथे आले असता, आरोपींनी त्यांची बाईक अचानक फिर्यादींच्या चालत्या कारसमोर आडवी लावली आणि त्यांना गाडी थांबवण्यास भाग पाडले.

गाडी थांबल्यानंतर आरोपी जयेश जनार्दन भागडे याने फिर्यादी कदम यांना गाडीतून खाली उतरवले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी दुसरा आरोपी किरण जनार्दन भागडे याने फिर्यादींच्या मानेच्या डाव्या बाजूला हाताचा जोराचा फटका मारला, ज्यामुळे फिर्यादी खाली पडले. त्यानंतर दोन्ही आरोपींनी संगनमत करून विनायक कदम यांना मारहाण केली, शिवीगाळ केली आणि “तुला जिवे ठार मारू” अशी धमकी दिली.

पोलिसांनी लावलेल्या कलमांमध्ये मोटार वाहन कायदा कलम १८५ (दारू पिऊन गाडी चालवणे/मद्यपान) याचा उल्लेख असल्याने, आरोपींनी मद्यधुंद अवस्थेत हा प्रकार केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. जयेश जनार्दन भागडे (वय ३५, रा. आबिटगाव, दत्तवाडी, ता. चिपळूण), किरण जनार्दन भागडे (वय ३०, रा. आबिटगाव, दत्तवाडी, ता. चिपळूण) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.