Friday, May 8, 2026
spot_img
Home गुन्हेगारी सामाईक विहिरीतील पाण्याच्या वादातून महिलेला दांडक्याने मारहाण

सामाईक विहिरीतील पाण्याच्या वादातून महिलेला दांडक्याने मारहाण

तेरवण थोरलीवाडी येथील घटना, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

राजापूर:- सामाईक विहिरीवर पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ५४ वर्षीय महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना राजापूर तालुक्यातील तेरवण थोरलीवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह चार जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुवर्णा मोहन खानविलकर (वय ५४, रा. तेरवण थोरलीवाडी) या दि. ६ मे रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास घराच्या स्लॅबवर आणि गुरांना पाणी घालण्यासाठी सामाईक विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना विहिरीवरील पाणी काढण्याचे ‘काढण’, रहाटाची कपी, रश्शी आणि रहाटाचा दांडा दिसून आला नाही.

या साहित्याबाबत त्यांनी तेथे उपस्थित असलेले सत्यवान खानविलकर यांना विचारणा केली असता, आरोपी चंद्रकांत खानविलकर याने “मला माहित नाही, मी काढण टाकलं नाही” असे उत्तर दिले. फिर्यादीने “असे तिसऱ्यांदा घडत आहे” असे म्हटल्याचा राग आल्याने आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

​वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपी रुपाली रवींद्र खानविलकर हिने हातातील लाकडी दांडक्याने सुवर्णा खानविलकर यांच्या डाव्या हाताच्या दंडावर जोरात मारून त्यांना दुखापत केली.

​या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात रुपाली रवींद्र खानविलकर (वय ३०), रवींद्र यशवंत खानविलकर (वय ५६), चंद्रकांत यशवंत खानविलकर (वय ५०), सत्यवान यशवंत खानविलकर (वय ५९) (सर्व रा. तेरवण थोरलीवाडी, ता. राजापूर) या चार संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे:

पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ११८(१), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.