सातपट लाभाचे आमिष दाखवत तरुणाची ६२ लाखांची ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरी:- गुंतवलेल्या रकमेचा सातपटीने लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत तरुणाची तब्बल ६२ लाख ४६ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी एकूण १० जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची ही घटना दि. २२ फेब्रुवारी ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत घडली आहे.

पाटील वासू बाबूलाल, संजय अण्णासाहेब कांबळे, संतोष एन्टरप्रायजेस, रवींद्र उद्धवराव शिंदे, झेडएफ गोल्ड ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीचा मालक निक याँग आणि ६ अज्ञात अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ११ संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात समीर प्रसादे (रा. सिद्धीविनायक नगर, रत्नागिरी) याने रविवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार समीर प्रसादेला एका अज्ञाताने ‘वेल्थ पासवर्ड ३१४१’ या व्हॉटस् ॲप ग्रुपला समाविष्ट करून घेतले. त्यानंतर समीरला रजिस्ट्रेशन लिंक पाठवून त्यावर ट्रेडिंग अकाऊंट उघडण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत समीरने पत्नी सिया प्रसादे हिच्या नावाने कंपनीचे ट्रेडिंग उघडले. त्यानंतर समीरने गुंतवलेली रक्कम ७ पटीने लाभ मिळवून दिली जाईल, असा प्लॅन संशयितांनी वेगळवेगळ्या मोबाईलवरून प्रसादला सांगून त्याचा विश्वास संपादित केला. त्यानंतर संशयितांनी वेळोवेळी प्रसादे याला आपल्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगून २२ फेब्रुवारी ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत एकूण ६२ लाख ४६ हजार रुपये त्याच्याकडून उकळले.

दरम्यान, त्यानंतर प्रसादेला आजवर कोणताही परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रसादेने रविवारी तातडीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. शहर पोलिसांनी संशयितांविरोधात भा. दं. वि. कायदा कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.