राजापूर:- घरकुल योजनेत मंजूर झालेल्या घराच्या बांधकामावरून झालेल्या किरकोळ वादातून तीन आरोपींनी घोडेपोई सडा येथे एका व्यक्तीच्या भावाच्या घरी घुसून लाकडी दांड्याने आणि कोयत्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना ३० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री घडली. या हल्ल्यात फिर्यादीसह त्याचा पुतण्याही जखमी झाला असून, गंभीर दुखापत झाल्यानंतर आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गोविंद लेंबरकर (वय ५०, रा. नालासोपारा, मूळ रा. सागवे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी संतोष लेंबरकर यांच्या घरकुल योजनेत मंजूर झालेल्या घराच्या बांधकामासाठी वाडीमध्ये जितू राणे यांच्या ट्रकने चिरे आणले होते. याच कारणावरून घोडेपोई येथील राजेश कल्याण बांदिवडेकर (वय ४०), रत्नाकर कल्याण बांदिवडेकर (वय ४३) आणि कल्याण भिवा बांदिवडेकर (वय ६५) या तिघांना राग आला होता.
या रागातूनच तिघे आरोपी ३० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १०:३० वाजताच्या सुमारास घोडेपोई सडा येथे संतोष लेंबरकर यांचे सख्खे भाऊ रवींद्र गोविंद लेंबरकर यांच्या घरी घुसले. यावेळी आरोपींनी संतोष लेंबरकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्या हातात लाकडी काठ्या (दांडके) आणि कोयता होता.
संतोष लेंबरकर यांना आरोपींनी त्यांच्या हातातील दांडक्याने मारहाण केली. यात संतोष लेंबरकर यांच्या उजव्या कानाच्या वरच्या बाजूला दांडक्याचा फटका बसून ते जखमी झाले. भांडण सोडवण्यासाठी आलेला फिर्यादी यांचा पुतण्या दत्ताराम शाम लेंबरकर यालाही आरोपींनी सोडले नाही. त्यालाही दांडक्याने हात आणि पायावर मारहाण करण्यात आली.
मारहाणीत फिर्यादींना गंभीर दुखापत झाल्याचे पाहून आरोपींनी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि शिवीगाळ करत तेथून निघून गेले. जखमी झालेल्यांमध्ये संतोष गोविंद लेंबरकर आणि दत्ताराम शाम लेंबरकर यांचा समावेश आहे. या घटनेनंतर संतोष लेंबरकर यांनी दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ४:११ वाजता राजापूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
राजापूर पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक ९३/२०२५ अन्वये आरोपी राजेश कल्याण बांदिवडेकर, रत्नाकर कल्याण बांदिवडेकर आणि कल्याण भिवा बांदिवडेकर या तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) अधिनियम २०२३ च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









