देवरूख:- साखरपा बसस्थानकात बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या खांद्याला लावलेल्या पर्समधील छोट्या पाकिटातून सोन्याचे मंगळसूत्र व अंगठी असा तब्बल २ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनिता विकास अवसरे (वय ४८, व्यवसाय गृहिणी, सध्या रा. परळ, मुंबई; मूळ रा. प्रभानवल्ली, वाणेवाडी, ता. लांजा) या आपल्या पतीसह अंत्रवली, ता. संगमेश्वर येथे जाण्यासाठी साखरपा बसस्थानकात आल्या होत्या. कोल्हापूर ते संगमेश्वरमार्गे चिपळूण जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील छोट्या पाकिटावर डल्ला मारला. यामध्ये अंदाजे पाच तोळे वजनाचे, सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि सुमारे साडेतीन ग्रॅम वजनाची १५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरीस गेली.
घटनेनंतर अवसरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल करता आली नाही. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी रात्री ८.५१ वाजता त्यांनी देवरूख पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.









