Tuesday, September 15, 2026
spot_img
Home गुन्हेगारी सव्वा कोटींच्या फसवणूक प्रकरणातील आरोपीचे अनेक गुन्हे उघडकीस

सव्वा कोटींच्या फसवणूक प्रकरणातील आरोपीचे अनेक गुन्हे उघडकीस

डोनेशनचे आमिष दाखवून ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना ओलीस ठेवून त्यांच्या बँक खात्यांचा गैरवापर

रत्नागिरी:- सव्वा कोटींच्या फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार गगनदीप भारद्वाज याला दिल्ली-नोएडा परिसरात सापळा रचून अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणूकीतील रक्कम एका ट्रस्टच्या खात्यात वळवून डोनेशनचे आमिष दाखवून ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना ओलीस ठेवून त्यांच्या बँक खात्यांचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे.

फिर्यादी मकरंद जोशी यांना संशयित आरोपींनी फोन करून आपण पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. फिर्यादीच्या नावाने बनावट बँक खाते उघडून त्याद्वारे मानवी तस्करी आणि मनी लाँड्रिंगसारखे गंभीर गुन्हे केल्याची भीती त्यांना घालण्यात आली. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना ‘डिजिटल अटक’ करण्यात आल्याचे सांगून सतत पाळत ठेवण्यात आली. यातून सुटका करण्यासाठी आणि ‘सिक्युरिटी डिपॉझिट’च्या नावाखाली आरोपींनी फिर्यादीकडून १ कोटी २३ लाख रुपये विविध बँक खात्यांमध्ये जमा करून घेतले. सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून ‘डिजिटल अटक’च्या धाकाने १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा रत्नागिरी सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

तपासादरम्यान ही रक्कम एका चॅरिटेबल ट्रस्टच्या खात्यात वळविण्यात आल्याचे समोर आले. आरोपींनी या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना ‘सीएसआर डोनेशन’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून उत्तर प्रदेशात बोलावले होते. तिथे त्यांना ओलीस ठेवून त्यांच्या बँक खात्यांची माहिती आणि धनादेश बळजबरीने मिळवून त्याद्वारे १ कोटी ४ लाख रुपयांचा अपहार केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. ०२/२०२६ नुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार गगनदीप भारद्वाज याचा नोएडा (उत्तर प्रदेश) येथे ठावठिकाणा लागताच पथकाने सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यात यापूर्वीही एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याचा जामीन न्यायालयाने नाकारला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार जाधव, पोलीस हवालदार संदीप नाईक आणि पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कदम यांच्या पथकाने केली.

कोणत्याही तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे सांगून बँक खात्याची माहिती मागितल्यास किंवा पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितल्यास घाबरून न जाता सावध राहावे. अशा कॉलवर विश्वास ठेवू नका, वैयक्तिक माहिती देऊ नका आणि तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी किंवा सायबर पोलीस ठाण्याच्या ८८३०४०४६५० या क्रमांकावर संपर्क साधावा. आर्थिक फसवणूक झाल्यास महाराष्ट्र सायबर क्राईम हेल्पलाईन १९३० वर त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे.