८ खलाशी सुखरूप बचावले
रत्नागिरी:- ‘धनलक्ष्मी’ या मच्छीमार नौकेचे इंजिन बंद पडल्यामुळे ती समुद्रात भरकटली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे समुद्रात अडकून पडलेल्या या नौकेला आणि त्यावरील ८ खलाशांना स्थानिक मच्छीमार व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे रविवारी सुखरूपपणे मिरकरवाडा जेट्टीवर आणण्यात आले.
धनलक्ष्मी ही नौका समुद्रात मासेमारीसाठी गेली असताना अचानक तिच्यात तांत्रिक बिघाड झाला. बोट सुरू होत नसल्याने आणि संपर्क तुटल्यामुळे ही बोट समुद्राच्या लाटांवर भरकटत रत्नागिरी व पावसाच्या दरम्यानच्या भागात आली होती. बोटीचे मालक व खलाशी यांनी मदत मिळवण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मच्छीमारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर याविषयीचा संदेश प्रसारित केला. हा संदेश मिळताच कोकण संघटकचे ताहीर मुल्ला यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी आपले सहकारी नावीद कनवडकर, मतीन डोंगरकर, सुहेल साखरकर, अल्ताफ साखरकर व नुरुल शेठ यांच्या मदतीने रात्रभर शोध व मदत मोहीम राबवली. मत्स्य विभागाचे अधिकारी चिन्मय साहेब, होमगार्ड आणि इतर कर्मचाऱ्यांनीही नौकेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रविवारी (ता. ६) सकाळी बोटीचे इंजिन सुरू करण्यात खलाशांना यश आले. त्यानंतर स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बोटीला सुरक्षितपणे मिरकरवाडा जेट्टीवर आणण्यात आले. जेट्टीवर आल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी मुंबईहून आलेल्या बोट मालकाची व खलाशांची भेट घेऊन त्यांच्या जेवणाची व पाण्याची सोय करत त्यांना धीर दिला, असे सुहेल साखरकर यांनी सांगितले.
“तीन दिवस नौका भरकटलेली होती. अशा वेळी शासकीय यंत्रणांनी मदतीसाठी धावून जाणे गरजेचे होते. परंतु, स्थानिक मच्छीमार व कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळेच या खलाशांना मदत मिळाली.”
- –जनाबभाई कारभारी, संस्थापक अध्यक्ष, सागर सम्राट मच्छीमार बचाव व संघर्ष समिती









