संचारबंदीच्या काळात जिल्ह्यात सर्वाधिक बाधितांची नोंद

23 दिवसात सापडले साडेदहा हजार रुग्ण

रत्नागिरी:-कोरोनाची दुसरी लाट येत्या काही दिवसात ओसरेल असा अंदाज वर्तविला जात आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात सापडलेले कोरोना बाधित मे महिन्यातील 23 दिवसात नोंदले गेले. कोरोना प्रादुर्भाव थांबवण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात जिल्ह्यात सर्वाधिक बाधितांची नोंद झाली. 1 ते 23 मे या कालावधीत 10 हजार 563 बाधित सापडले.

मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी महिन्यात सुरु झाली. रत्नागिरी जिल्ह्यात मार्चच्या दुसर्‍या आठवड्यापासून या लाटेचा प्रभाव दिसू लागला. मार्चच्या अखेरीस कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढू लागली. जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट वाढत होता. शिमगोत्सव, विवाह सोहळे, सार्वजनिक उत्सव यासह लोकांचे एकत्र येण्याचे प्रमाण अधिकाधिक वाढले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव गावागावात होऊ लागला. मार्च 2020 ते मार्च 2021 पर्यंत जिल्ह्यातील बाधितांची एकुण संख्या 11 हजार  107 होती. एप्रिल महिन्यात त्यात 11 हजार 254 रुग्णांची भर पडली. बाधितांचा आकडा दिवसाला सरासरी पाचशे होता. तुलनेत बरे होण्याचे प्रमाण घसरले. हा दर 66.70 टक्केपर्यंत आला होता. मार्च महिन्याच्या अखेरीस लागू केलेली संचारबंदी एप्रिल महिन्यात कडक करण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा पूर्णतः बंद ठेवण्यात आल्या. ही बंदी मे महिना संपत आला तरीही सुरुच आहे. मात्र कोरोना रुग्णांचा टक्का जैसे थेच आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यातील 23 दिवसात 10 हजार 563 बाधित सापडले. जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट 17 टक्केपेक्षा अधिक आहे. ही धोक्याची घंटा असून हा दर कमी करण्यासाठी आरोग्य विभागापुढे आव्हान आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी मोहीम राबविली होती. गावागावात जाऊन रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दिड हजाराहून अधिक कोरोना बाधितांची नोंद झाली. गावागावात रुग्ण वाढल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार दिवसात दिवसाला पाचशे बाधित सापडण्याचे प्रमाणे कमी आले आहे. साडेतीनशे ते सोडचारशे या दरम्यान बाधित आढळत आहेत. दुसरी लाट ओसरण्याची ही लक्षणे असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे.

पहिल्यापेक्षा दुसर्‍या लाटे मृतांचा आलेख धक्कादायक होता. आर्थिक वर्षात जिल्ह्यात 377 कोरोना बाधितांचा मृत्यू नोंदला गेला. त्यानंतर एप्रिल, मे या दोन महिन्यात त्यात मोठी भर पडली. दिवसाला सरासरी 12 ते 15 जणांचा मृत्यू नोंदला गेला. एप्रिल महिन्यात 279 जणं तर मे महीन्याच्या 23 दिवसात 438 जणं कोरोनाने मृत पावले. मृत्यूदरही तीन टक्के ओलांडून गेला आहे.