Tuesday, May 5, 2026
spot_img
Home रत्नागिरी खेडशीतील तरुणाचा कारमध्येच मृत्यू

खेडशीतील तरुणाचा कारमध्येच मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील खेडशी येथील एका ४३ वर्षीय तरुणाचा उभ्या कारमध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैभव जयप्रकाश सावंतदेसाई (रा. नवेदरवाडी, खेडशी) असे मृत तरुणाचे नाव असून, ही घटना २ मार्च रोजी दुपारच्या सुमारास एकदंतनगरकडे जाणाऱ्या फाट्याजवळउघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील एकदंतनगर फाट्याजवळ वैभव सावंतदेसाई यांची अर्टिगा कार (क्रमांक एम.एच. ०८ ए.एन. ८९०४) रस्त्याकडेला उभी होती. बराच वेळ गाडी एकाच ठिकाणी उभी असल्याने आणि गाडीच्या काचांवर वाफ (बाष्प) जमा झाल्याने परिसरातील नागरिकांना संशय आला. खबर देणाऱ्या व्यक्तीने गाडीच्या जवळ जाऊन पाहिले असता, वैभव हे ड्रायव्हर सीट मागे घेऊन झोपलेल्या अवस्थेत दिसून आले. जमा झालेल्या नागरिकांनी तात्काळ गाडीची काच फोडून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र वैभव यांची कोणतीही हालचाल होत नव्हती आणि त्यांच्या तोंडातून फेस आलेला दिसत होता.

उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने त्याच अर्टिगा कारमधून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून दुपारी १२.३० वाजता औषधोपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केला. २ मार्च रोजी दुपारी २ वाजता या प्रकरणाची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली असून, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव सावंतदेसाई यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.