Thursday, July 30, 2026
spot_img
Home संगमेश्वर संगमेश्वरात मध्यरात्री एसटी बसच्या बॅटरीचा भीषण स्फोट

संगमेश्वरात मध्यरात्री एसटी बसच्या बॅटरीचा भीषण स्फोट

संगमेश्वर:- संगमेश्वर रेल्वे स्थानक परिसरात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने प्रवाशांची अक्षरशः झोप उडाली. देवरुख आगाराची एसटी बस स्थानकात उभी असतानाच तिच्या बॅटरी कक्षात अचानक झालेल्या भीषण तांत्रिक स्फोटाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. बॉम्बस्फोट झाल्याचा भास निर्माण करणाऱ्या या प्रचंड आवाजामुळे प्रवाशांमध्ये एकच धावपळ उडाली, तर काही काळ स्थानक परिसर भीतीच्या छायेत गेला.

मिळालेल्या माहितीनुसार, देवरुख-संगमेश्वर रेल्वे स्थानक ही एसटी क्रमांक एमएच १४ एल एक्स ७१४२ दिवा-रत्नागिरी पॅसेंजरने येणाऱ्या प्रवाशांसाठी स्थानकात उभी होती. बाहेरून अगदी नवकोरी आणि आकर्षक दिसणारी ही बस काही क्षणांतच भीतीचे कारण ठरली. रात्री सुमारे १.१० वाजण्याच्या सुमारास अचानक झालेल्या प्रचंड आवाजाने परिसर हादरून गेला. आवाज इतका भीषण होता की अनेकांना क्षणभर बॉम्बस्फोट झाल्याचाच संशय आला.

घटनेनंतर काही क्षणांतच बसच्या बॅटरी कक्षातून मोठ्या प्रमाणात धूर, पाणी आणि ॲसिडयुक्त द्रव बाहेर पडू लागला. त्यामुळे हा प्रकार बॅटरीतील तांत्रिक बिघाड किंवा शॉर्टसर्किटमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. सुदैवाने, त्या वेळी बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

दिवा-रत्नागिरी पॅसेंजर स्थानकात दाखल होताच देवरुखकडे जाणारे प्रवासी एसटीकडे धावले; मात्र तांत्रिक बिघाडामुळे वाहकाने बसमध्ये प्रवेश नाकारला. पर्यायी बस येईपर्यंत प्रवाशांना मध्यरात्री तब्बल एक तास उभे राहावे लागले. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल झाले. या घटनेमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बाहेरून चकचकीत दिसणाऱ्या बस आतून किती सुरक्षित आहेत, असा सवाल संतप्त प्रवाशांनी उपस्थित केला आहे

जर हाच स्फोट बस प्रवाशांनी भरलेली असताना किंवा भरधाव वेगात रस्त्यावर धावत असताना झाला असता, तर मोठा अनर्थ ओढवला असता, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.