Sunday, May 3, 2026
spot_img
Home गुन्हेगारी संगमेश्वर येथील अल्पवयीन मुलीवर पुण्यात अत्याचार

संगमेश्वर येथील अल्पवयीन मुलीवर पुण्यात अत्याचार

नराधम आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातून शिक्षणासाठी पुण्यात गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर ओळखीच्याच तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक ओळखीचा गैरफायदा घेत आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन पीडितेवर अत्याचार करणाऱ्या युसूफ मोहमद सय्यद (रा. आंबेड खुर्द) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे संगमेश्वर तालुक्यासह संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी पुण्यात आपल्या भावाकडे राहून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होती. १७ एप्रिल रोजी सकाळी आरोपी युसूफ सय्यद आपल्या कारने तिच्या निवासस्थानी पोहोचला. त्याने पीडितेच्या घरच्यांना नुकसान पोहोचवण्याची भीती घालून तिला जबरदस्तीने गाडीत बसवले. त्यानंतर एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. नराधमाचे हे कृत्य एवढ्यावरच थांबले नाही, तर दुसऱ्या दिवशीही त्याने तिला पुन्हा दुसऱ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्या असहायतेचा फायदा घेतला.

पीडितेने या प्रकरणाची माहिती संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमेश्वर पोलिसांनी आरोपीला त्याच्या राहत्या परिसरातून ताब्यात घेतले. सदर गुन्ह्याचे ठिकाण पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी खडक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ओळखीच्या व्यक्तीकडूनच असे नीच कृत्य घडल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.