दापोली वावघर येथील घटना
दापोली:- तालुक्यातील वावघर गुरववाडी येथील एका ५५ वर्षीय व्यक्तीचा झोपेत असताना श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ३१ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
उदय रामचंद्र राऊत (वय ५५, रा. वावघर गुरववाडी, ता. दापोली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उदय राऊत हे शनिवारी पहाटे झोपेत असताना त्यांना अचानक खोकल्याची उबळ आली. त्यानंतर त्यांचा श्वास कोंडला गेला आणि ते बेशुद्ध पडले.
राऊत बेशुद्ध पडल्याचे लक्षात येताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, पहाटे ६.२५ च्या सुमारास रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे वावघर परिसरात शोककळा पसरली आहे.
या घटनेबाबत दापोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी बी.एन.एस.एस. कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास पोलीस कर्मचारी करत आहेत.









