महाविकास आघाडीकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन
रत्नागिरी:- जेष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे पुरस्कार वितरण कार्यक्रमात झालेल्या श्री सेवकांचे मृत्यूबाबत दोषींवर कारवाई व्हावी याबाबत रत्नागिरीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उध्दव ठाकरे शिवसेना व इतर समविचारी पक्ष व संघटना या महाविकास आघाडीतर्फे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या सर्व गोष्टींची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे व जे शासकीय अधिकारी, जे आयोजक, मंत्री, महाराष्ट्र सरकार याला जबाबदार आहेत त्यांचेवर त्वरीत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणे गरजेचे असल्याची मागणी करण्यात आली.
महाविकास आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उध्दव ठाकरे शिवसेना व इतर समविचारी पक्ष व संघटना) यांनी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांना दिलेल्या निवेदनानुसार खारघर, नवी मुंबई येथे रविवार 16 एपिल या दिवशी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करणेत आले होते. हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देणेत येणार होता. एप्रिल महिन्यात किती कडक उन्हाळा असतो याची माहिती सगळ्यांनाच असते. आपल्या मार्गदर्शकाला गुरुला इतका मोठा नागरिक सन्मान मिळत असेल तर यासाठी या पुरस्कार वितरण समारंभाला काही लाखातून श्रीसेवक निरनिराळ्या ठिकाणाहून येणार याची कल्पना आयोजकांना होती.
अशावेळी मानाचा पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थितरित्या करणे आवश्यक होते. तापत्या ऊन्हात दुपारी 12.30 वाजता हा पुरस्कार वितरण समारंभ खुल्या मैदानात न ठेवता संध्याकाळी ठेवायला हवा होता. अथवा बंदिस्थ हॉलमध्ये ठेवणे गरजेचे होते. दुपारी तप्त उन्हात तेही खुल्या मैदानात कार्यक्रम ठेवल्यामुळे 8 ते 9 लोकांना उष्माघाताने प्राण गमवावे लागले व अनेक श्रीसेवक अत्यवस्त झाले व समारंभाचे रूपांतर मृत्यूच्या तांडवात झाले. या कार्यक्रमासाठी जर सरकारने 12 ते 14 कोटी रूपये मंजूर केले होते. तर नक्कीच बंदिस्त मोठ्या हॉलमध्ये पुरस्कार वितरण समारंभ घेणे गरजेचे होते व इतकीही अक्कल जर सरकारला नसेल तर हे निरूपयोगी सरकार ज्यांना लोकांच्या जिवाचीही पर्वा नाही ते महाराष्ट्र कसा सांभाळणार? असा सवाल महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला आहे.
1000 गाड्या लोकांना आणण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या तर रखरखीत उन्हात जाणुनबुजून हा कार्यक्रम मोकळ्या मैदानात ठेवणेत आला का ? की कोणाला दाखविण्यासाठी गर्दी मोकळ्या मैदानात जमविण्यात आली ? हे जे निरपराध श्रीसेवकांचे बळी गेले ते उष्णतेचे की नियोजनशून्य कारभाराचे ? मंत्री, राजकीय नेते मंडपात सामान्य जनता उन्हात. या सर्व गोष्टींची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. आपण याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर त्वरीत गुन्हे दाखल करावेत. अन्यथा महाविकास आघाडीतर्फे आम्हाला आयोजक, शासकीय अधिकारी व महाराष्ट्र सरकार यांचेवर कायदेशीर कारवाई करणे भाग पडेल अशा आशयाचे निवेदन राज्यपाल यांना देण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आले.









