Friday, May 15, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीत पेट्रोलसाठी पुन्हा रांगा; पुरवठा विस्कळीत झाल्याने टंचाई

रत्नागिरीत पेट्रोलसाठी पुन्हा रांगा; पुरवठा विस्कळीत झाल्याने टंचाई

रत्नागिरी:- जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईबाबत कमालीची चर्चा सुरू असून, या गोंधळामागे प्रत्यक्षात राष्ट्रीय स्तरावर इंधनाचा अभाव नसून ‘तांत्रिक’ आणि ‘धोरणात्मक’ कारणे असल्याचे समोर आले आहे. तेल कंपन्यांनी डीलर्ससाठी लागू केलेली नवी ‘आगाऊ पेमेंट‘ प्रणाली आणि विस्कळीत झालेली पुरवठा साखळी यामुळे इंधनपुरवठ्याचा खोळंबा झाला असून, रत्नागिरीतील पेट्रोल पंपांवर सध्या वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

इंधन वितरणाच्या प्रक्रियेत तेल कंपन्यांनी मोठा बदल केला आहे. कंपन्यांनी आता डीलर्सकडून इंधनासाठी आगाऊ रकमांची मागणी सुरू केली आहे. यामुळे अनेक स्थानिक पेट्रोल पंप चालकांना अचानक लाखो रुपयांची जुळवाजुळव करणे जिकिरीचे जात आहे. ज्या डीलर्सना ही रक्कम वेळेत भरणे शक्य झाले नाही, त्यांच्याकडे इंधनाचा पुरवठा होण्यास विलंब होत आहे. हा तांत्रिक पेच सुटेपर्यंत ग्राहकांना मात्र ताटकळत उभे राहावे लागत असून, अनेक पंपांवर ‘नो स्टॉक‘चे फलक झळकत आहेत.

सोशल मीडियावरून पसरलेल्या अफवांनी या समस्येत अधिकच भर घातली आहे. इंधन संपणार या भीतीने नागरिक वाहनांच्या टाक्या पूर्ण भरून घेत आहेत, ज्यामुळे मागणीत अचानक ५० ते ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यातच आठवड्याच्या शेवटी डेपो बंद असल्याने आणि डेपोमधून पंपांपर्यंत इंधन पोहोचण्यास विलंब होत असल्याने पुरवठा साखळीवर मोठा ताण आला आहे. बुधवारी रत्नागिरी शहर व परिसरातील पंपांवर इंधन भरण्यासाठी वाहनधारकांची मोठी गर्दी दिसून आली.

देशात पुढील ६० ते ९० दिवसांचा पुरेसा इंधन साठा उपलब्ध असल्याचे वरिष्ठ स्तरावरून स्पष्ट करण्यात आले आहे. ही प्रत्यक्ष टंचाई नसून केवळ वितरणातील तात्पुरता विस्कळीतपणा आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक साठवणूक करू नये, असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे. मात्र, हा तांत्रिक अडथळा लवकर दूर न झाल्यास सामान्य प्रवाशांच्या मनस्तापात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“काही इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून प्रत्यक्ष कमी इंधन पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. मागणीप्रमाणे इंधनपुरवठ्याच्या गाड्या उपलब्ध होत नाहीत. ही उभी ठाकलेली समस्या पाहता सध्या इंधन पुरवठ्याचे चित्र बदललेले आहे.”- सुधीर लोध, अध्यक्ष – फामपेडा