रत्नागिरी शहराचा पाणी पुरवठा सोमवार, गुरुवार बंद
रत्नागिरी:- कोकणासह रत्नागिरीतील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचा परिणाम पाणीपुरवठा करणार्या धरणावर झाला आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्या शीळ धरणात केवळ ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. रत्नागिरी पालिकेने सोमवार, गुरुवार या दोन दिवशी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे निर्णय घेतला आहे. परंतु उष्म्यामध्ये अधिक वाढ झाल्यास मे च्या पहिल्या आठवड्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ रत्नागिरी पालिकेवर येणार आहे.
रत्नागिरी शहराला शीळ व पानवल या दोन धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु पानवल धरणातील पाणीसाठा जानेवारीमध्येच संपुष्टात आल्याने आता केवळ शीळ धरणावरच शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी भिस्त आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून पाणी साठ्याचे बाष्पीभवन होऊन पाणीसाठ्यात घट होत आहे. शीळ धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून सध्या ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे रत्नागिरी पालिकेने आठवड्यातील सोमवार, गुरुवार या दोन दिवशी पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय यापूर्वी घेतला आहे. परंतु वाढते उश्म्यामुळे पाणीसाठ्यात अधिकच घट होत असल्याने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिकेने सुरू केले आहे.
दि.१५ जूनपर्यंत शहराला पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी मे च्या पहिल्या आठवड्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने नियोजन सुरू करण्यात आले आहे. नव्या नळ पाणी योजनेच्या कामामुळे पाण्याची गळती पूर्णत: थांबली आहे. त्यामुळेच ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याचे मुख्य अधिकारी तुषार बाबर यांनी सांगितले.