रत्नागिरी:- शहराजवळील शिरगाव-दत्त मंदिर येथे विद्यार्थ्यांना आणण्यासाठी रत्नागिरीत येणाऱ्या रिक्षावर झाडाची मोठी फांदी पडली. यामध्ये रिक्षाचालक जखमी झाला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शाहअजीम महम्मद हुसैन पटेल (वय ५२, रा. साखरतर, रत्नागिरी) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १) दुपारी चारच्या सुमारास शिरगाव दत्तमंदिर, रेशनदुकान रस्त्यावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार जखमी शाहअजीम पटेल हे रिक्षा (क्र. एमएच०८ इ ८८८५) घेऊन शाळेतून सुटणाऱ्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी साखरतरहून रत्नागिरीकडे येत होते. शिरगाव-दत्तमंदिर येथे आले असता अचानक सुटलेल्या वाऱ्याने झाडाची मोठी फांदी तुटून त्यांच्या रिक्षावर पडली या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.









