Thursday, October 15, 2026
spot_img
Home गुन्हेगारी शिरगाव ग्रामपंचायतीत १.४३ लाखांचा अपहार; तिघांवर गुन्हा दाखल

शिरगाव ग्रामपंचायतीत १.४३ लाखांचा अपहार; तिघांवर गुन्हा दाखल

चिपळूण:- तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ग्रामस्थांकडून घरपट्टी, पाणीपट्टी आणि वीजकरापोटी वसूल केलेल्या रकमेचा बँकेत भरणा न करता सुमारे ७ महिने स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून १,४३,०६९/- रु. चा अपहार केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत शिरगाव ग्रामपंचायतीमधील घरपट्टी, पाणीपट्टी आणि वीजकर वसुलीची जबाबदारी संशयित आरोपींकडे देण्यात आली होती. या काळात त्यांनी ग्रामस्थांकडून एकूण १ लाख ४३ हजार ६९ रुपये वसूल केले. शासकीय नियमांनुसार ही रक्कम तात्काळ ग्रामपंचायत शिरगावच्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (शाखा: शिरगाव) येथील बचत खात्यात (खाते क्र. १४०२००६०२०७०४) जमा करणे आवश्यक होते. मात्र, आरोपींनी ही रक्कम बँकेत जमा न करता स्वतःजवळ ठेवून वापरली आणि अपहार केला.

​महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाचे विविध परिपत्रके यांच्यातील नियमांचे उल्लंघन करून ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात ही अनियमितता करण्यात आली. फिर्यादी निता निलेश शिंदे (वय ३३ वर्षे, रा. शिरगाव, पाटीलवाडी, ता. चिपळूण) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ​धनंजय दत्ताराम सोलकर (वय ३३), ​दिनेश दत्ताराम धागडे (वय ४२), ​श्रीकृष्ण गंगाराम कदम (वय ५०) (सर्व रा. शिरगाव, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.