Thursday, October 15, 2026
spot_img
Home गुहागर शिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

शिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

दापोलीत अपघाती फायरिंगमध्ये एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

दापोली:- तालुक्यातील वणौशी तर्फे पंचनदी खोंडारणवाडी येथे ३० सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शिकारीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा बंदुकीतून अचानक गोळी सुटल्यामुळे जागीच मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खोंडारण धारणेकडील जंगलमय भागात सचिन शांताराम शिगवण (वय ४२, रा. वणोशी खोडारणवाडी, ता. दापोली) आणि सुनिल महादेव पान्दे (वय ४६, रा. वणोशी खोडारणवाडी) हे दोघे शिकारीची वाट पाहत बसले होते.

या दरम्यान, आरोपी सचिन शिगवण याने सोबत आणलेली विनापरवाना व बेकायदेशीर काडतूस भरलेली बंदूक अतिशय निष्काळजीपणे हाताळली. त्यावेळी त्याचा पाय लागून सदर बंदूक पायातून सटकली आणि खाली दगडावर आपटली. या धक्क्याने बंदुकीतून अचानक काडतूस फायर झाले.
गोळीबारामुळे सुटलेले छरे सचिन शिगवण याच्या मांडीतून आणि गुप्त भागातून शरीरात शिरून पोटातून बाहेर आले, ज्यामुळे त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तसेच, सोबत असलेला दुसरा जखमी सुनिल महादेव पांन्दे याच्या उजव्या पायाच्या ढोपराजवळ दोन छरे लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा फिर्यादी पुजा आदित्य हिरेमठ यांनी १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०६ (१), १२५ (अ), (ब) तसेच भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३/२५, ३/५ नुसार गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून रक्तमिश्रित माती, साधी माती, दोन जिवंत काडतुसे, एक रिकामे काडतूस, २० हजार रुपये किमतीची एक गावठी बनावटीची सिंगल बॅरल १२ बोर रायफल आणि दोन हजार रुपयांचा एक मोबाईल असा एकूण २२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.