Tuesday, September 15, 2026
spot_img
Home गुहागर एसटी बसची दुचाकीला धडक; तरुण गंभीर जखमी

एसटी बसची दुचाकीला धडक; तरुण गंभीर जखमी

मोडका आगार परिसरातील घटना

गुहागर: गणेशोत्सवामुळे कोकणाकडे येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढल्याने गुहागर-चिपळूण मार्गावर वाहतुकीची वर्दळ वाढलेली असतानाच रविवारी सायंकाळी मोडका आगार परिसरातील खातू मसाले येथील परिसरात एसटी बस आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, असगोली येथील तरुण दुचाकीवरून प्रवास करीत असताना त्याच्या वाहनाची एसटी बसला धडक झाली. अपघातातील धडकेची तीव्रता मोठी असल्याने तरुणाच्या ढोपराखालील पायाला गंभीर दुखापत झाली. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला मदत केली.

जखमी तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील वैद्यकीय उपचारांसाठी पाठविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातामुळे काही काळ घटनास्थळी गर्दी झाली होती.

दरम्यान, गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. त्यामुळे गुहागर-चिपळूण मार्गावर वाहनांची संख्या वाढली असून वाहतूक सुरळीत ठेवण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

या अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून एसटी बस आणि दुचाकीची धडक कोणत्या परिस्थितीत झाली, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे. अधिकृत तपासानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.