शाळकरी मुलीचे लैंगिक शोषण; शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

खेड:- तालुक्यातील एका गावातील शाळकरी मुलीचे लैंगिक शोषण करून तिला व्हिडीओ कॉल करून धमकवणाऱ्या शिक्षकाविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.        

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील एका शाळेत शिकणाऱ्या मुलीचे २ डिसेंबर २०२१ ते १० जानेवारी २०२२ या कालावधीत श्रीकांत बिरा मासाळ ( ४१, रा . भरणेंनाका , खेड , मूळ गाव मोरवडे , ता . मंगळवेढा , जिल्हा सोलापूर ) या शिक्षकाने लैंगिक शोषण केले . तिला व्हॉट्सॲपवर मेसेज करून शिवीगाळ केली तसेच व्हिडीओ कॉल करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले . या प्रकाराने घाबरलेल्या पीडित मुलीने आपल्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर काल दि . १८ रोजी पोलिसांनी शिक्षकाविरोधात  गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.