रत्नागिरी:- शहरातील नवीन आणि जुने भाजीमार्केट नवा साज घेऊन लवकरच उभे राहणार आहे. या दोन्ही भाजी मार्केटच्या इमारती फारच धोकादायक बनल्या आहेत. ही दोन्ही मार्केट रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीची आहेत. मार्केटमध्ये गाळे धारकांची मुदत न संपल्याने ते गाळेधारक तेथून हलण्यास राजी नाहीत. सध्या दोन्ही भाजी मार्केटच्या नूतन इमारतींचा आराखडा तयार आहे.
शहराच्या बाजारपेठेतील जुने भाजी मार्केट फारच जुने आहे. या मार्केटची इमारत कौलारू असून ती धोकादायक बनली आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीची ही इमारत असून आजूबाजूला सुमारे 5 गुंठे जागा आहे. या जागेत तळमजला अधिक पहिला मजला अशी नवीन कौलारू इमारत उभारण्याबाबत पालकमंत्री उदय सामंत आग्रही आहेत.
शेजारी दोन तलाव असून त्या तलावांच्या ठिकाणी देवस्थान असल्यामुळे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होते. त्यामुळे या तलावाच्या ठिकाणी कोणतीच अडचण होऊ नये, अशा पद्धतीने इमारतीचा आराखडा बनविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार याचा आराखडादेखील बनवण्यात आला
आहे.
नवीन भाजीमार्केट हे सुद्धा नगर परिषदेच्या मालकीचे आहे. ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल आल्यानंतर मार्केटमधील गाळेधारकांनी जागा सोडावी यासाठी ‘रनप’कडून नोटीस बजावण्यात आल्या. या मार्केटमधील गाळेधारकांचीही मुदत न संपल्याने रनपच्या नोटीसला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असून या नवीन भाजीमार्केट इमारतीचा आराखडाही तयार आहे. त्यामुळे दोन्ही नवीन भाजीमार्केट इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर प्रत्यक्ष इमारत बांधणीला प्रारंभ होऊ शकणार आहे. यामुळे रत्नागिरीच्या वैभवात भर पडणार आहे.









