Tuesday, May 19, 2026
spot_img
Home रत्नागिरी मिरकरवाडा येथील झोपडपट्टीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

मिरकरवाडा येथील झोपडपट्टीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा परिसरात असलेल्या एका पडीक झोपडपट्टीला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. रात्री १२:०० ते १२:३० च्या सुमारास अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आग विझवण्यात यश आले असून मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरकरवाडा येथील एका पडीक झोपडपट्टीला रात्रीच्या शांततेत अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने प्रशासनाला याची कल्पना दिली.

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषद अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता जास्त असली तरी, कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे आग आजूबाजूच्या परिसरात पसरण्यापासून रोखण्यात यश आले.

लागलेल्या या आगीत पडीक झोपडपट्टी जळून खाक झाली असली तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. रात्रीची वेळ असल्याने आणि परिसर पडीक असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती, परंतु अग्निशमन दलाच्या वेळेत पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.